Belagavi

सुवर्णसौधमध्ये सुवर्ण संमेलनाचे शानदार आयोजन

Share

सुवर्ण व्यावसायिकांना विनाकारण त्रास होणार नाही याची काळजी घेण्यास आणि त्यांच्या संरक्षणास सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. बेळगावमधील सुवर्णसौध येथे आयोजित ‘सुवर्ण संमेलन’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

बेळगावमधील सुवर्णसौध सभागृहात मंगळवारी दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने ‘सुवर्ण संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना सतीश जारकीहोळी यांनी पारंपरिक दागिने निर्माते आणि कारागिरांसमोरील आव्हाने सरकार जाणून असल्याचे सांगितले. या असंघटित क्षेत्राला बळकट करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, तसेच बेळगावमधील सुवर्ण कलेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची ठरतील, असे सतीश जारकीहोळी यांनी म्हटले.

बेळगाव जिल्ह्यातील सुवर्ण उद्योगाचा स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. व्यापारी आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती करण्यास सरकार बांधील आहे. पिढ्यानपिढ्या या व्यवसायात असलेल्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी असोसिएशनने प्रयत्न करावेत आणि उद्योगापुढील समस्यांवर उपाय शोधावेत. सुवर्ण उद्योगाचा विकास आणि व्यापाऱ्यांच्या अडीअडचणींना दाद देण्यासाठी सरकार सदैव तयार आहे, अशी ग्वाही सतीश जारकीहोळी यांनी दिली.

अखिल भारतीय रत्न आणि आभूषण देशांतर्गत परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सुवर्ण व्यापारातील फसवणूक रोखण्याची मागणी केली. ज्वेलर्स दुकानांना चोख सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी. सुवर्ण व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी पोलीस विभागाने घ्यावी आणि त्यांना योग्य संरक्षण द्यावे, अशी विनंती राजेश रोकडे यांनी केली.

सुवर्ण व्यापाराशी संबंधित कायदेशीर किंवा प्रशासकीय अडथळ्यांवर चर्चा करून ते तातडीने सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मणिकंठ अन्वेकर, मानद सचिव वैभव वेर्णेकर, चेअरमन राजेश रोकडे, अविनाश गुप्ता, डॉ. चेतनकुमार मेहता, श्रीकांत करी, गजानन अनवेकर, प्रशांत रेवणकर, जीवन वेरणेकर, नागराज वेरणेकर, संजय अवनेकर, गिरीश जयानंद अर्कासाली यांच्यासह घटप्रभा आणि बैलहोंगलमधील पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: