भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील महान क्रांतीकारक भगतसिंग यांच्या हुतात्मा दिनाचे औचित्य साधून धारवाडमधील नवनगर येथे त्यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. आमदार अरविंद बेल्लद यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करून क्रांतीकारकांना मानवंदना देण्यात आली.

नवनगरमधील भगतसिंग युवक मंडळ आणि श्रीधर सिंग सांगलीकर यांच्या नेतृत्वाखाली आयटीबीटी चौकात हा सोहळा पार पडला. विधानसभेचे उपनेते आणि आमदार अरविंद बेल्लद यांनी पुतळ्याचे पूजन करून त्याचे अनावरण केले. यावेळी बोलताना अरविंद बेल्लद यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या बलिदानाचे स्मरण केले. आजच्या पिढीने खऱ्या देशभक्तीची व्याख्या समजून घेण्यासाठी या क्रांतीकारकांचा इतिहास अभ्यासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अरविंद बेल्लद यांनी केले.

या सोहळ्यादरम्यान आमदार अरविंद बेल्लद यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला हुबळी-धारवाड महानगरपालिकेच्या सदस्या सुनीता माळवदकर, ज्येष्ठ नागरिक मल्लार्जुन, मंजुनाथ हेबसूर यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments