बेळगाव शहर आणि जिल्ह्यात इंधन टंचाई निर्माण होणार असल्याच्या एका चुकीच्या बातमीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोमवार रात्रीपासूनच पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून इंधन मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी ओढाताण होत आहे.

बेळगावमधील अनेक पेट्रोल पंप बंद असून केवळ काही ठराविक ठिकाणीच इंधन पुरवठा सुरू आहे. यामुळे सुरू असलेल्या पंपांवर नागरिकांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. पेट्रोल संपण्याच्या भीतीने नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत असून ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले आहे.

सोशल मीडियावरील एका संदेशामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला आहे. पेट्रोल मिळणार नाही या भीतीने लोक केवळ वाहनांमध्येच नाही, तर बाटल्या आणि बॅरलमध्येही इंधन साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या आणि खऱ्या गरजूंना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

पेट्रोल पंपावरील कर्मचारी देखील नागरिकांच्या या वागण्यामुळे हवालदिल झाले आहेत. शहरात पेट्रोलचा तुटवडा नाही आणि सर्वांना इंधन मिळेल, असे वारंवार सांगूनही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. विनाकारण भीती बाळगल्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
इंधन टंचाईच्या अफवेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दोन-तीन तास रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे नागरिक प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त करत असल्याची प्रतिक्रिया काही वाहनधारकांनी दिली.
सोशल मीडियावरील संदेशांमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. पेट्रोल मिळवण्यासाठी बाटल्या आणि बॅरल घेऊन आलेल्या गर्दीमुळे आपत्कालीन स्थितीत पेट्रोल हव्या असलेल्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे नागरिकांनी म्हटले.
शहरात पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही, नागरिकांनी केवळ अफवांना बळी पडून गर्दी केली आहे. आम्ही समजावून सांगत असूनही लोक ऐकत नसल्याने गोंधळ वाढत असल्याची खंत पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
“नागरिकांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. देशामध्ये किंवा बेळगावमध्ये इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवून स्वतःला संकटात टाकू नये. रोजच्याप्रमाणेच गरजेनुसार पेट्रोल भरून घ्यावे, कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही इंधन पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट केले आहे,” असे आवाहन पेट्रोल व्यावसायिक आणि माजी आमदार फिरोज सेठ यांनी केले आहे.


Recent Comments