बेळगाव तालुक्यातील कडोली जिल्हा पंचायत क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेने कुस्तीप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, चिक्कोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी आणि युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली कडोलीमध्ये या कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला. मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक तथा केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील आणि बेळगाव तालुका सरचिटणीस प्रदीप एम. जे. यांच्या देखरेखीखाली हा क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या पार पडला.

ग्रामीण खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत विविध भागांतील नामवंत मल्लांनी सहभागी होऊन आपले बाहुबळ प्रदर्शित केले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य आणि कडोली गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. जारकीहोळी कुटुंबाने क्रीडा क्षेत्राला दिलेल्या या पाठबळाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

कडोली गावात रंगलेल्या या कुस्ती स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, अशा स्पर्धांमुळे कुस्ती परंपरा जिवंत राहण्यास मदत होईल, असे मत मलगौडा पाटील यांनी व्यक्त केले.

ग्रामीण भागातील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवावी, यासाठी सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया प्रदीप एम. जे. यांनी दिली.

या कुस्ती मैदानातील विजेत्या मल्लांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी जारकीहोळी कुटुंबाच्या क्रीडाप्रेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Recent Comments