बेळगावमधील सकल जैन समाजाच्या वतीने २९ आणि ३० मार्च रोजी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे.
या महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये जैन समाजासह सर्व धर्मीय बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार संजय पाटील यांनी केले आहे. बेळगावमध्ये मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत संजय पाटील बोलत होते. गेल्या २८ वर्षांपासून सकल जैन समाज हा महोत्सव साजरा करत असून, यंदा एक आठवडाभर विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये रक्तदान, फूड फेस्टिव्हल आणि महिलांची ‘अहिंसा बाईक रॅली’ मुख्य आकर्षण असेल. २४ मार्च रोजी भरतेश होमिओपॅथी महाविद्यालय आणि २८ मार्च रोजी गोमटेश विद्यापीठात भव्य रक्तदान शिबिर संपन्न होईल, अशी माहिती संजय पाटील यांनी दिली.
या महोत्सवांतर्गत २५ ते २७ मार्च दरम्यान कौटुंबिक भजन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, पाककला स्पर्धा आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. २६ मार्च रोजी स्तोत्र पठण, थाळी सजावट आणि नाट्य स्पर्धा होतील, तर २७ मार्च रोजी द्विपात्री अभिनय आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा रंगतील. २८ मार्च रोजी मुलांसाठी ‘महावीर’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
येत्या २९ मार्च रोजी पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा जैन समाजाच्या वतीने विशेष सत्कार केला जाणार आहे. याच दिवशी राज्यपालांच्या पत्नी महिलांच्या बाईक रॅलीला हिरवा कंदिल दाखवतील. ३० मार्च रोजी टिळक चौक ते महावीर भवन अशी भव्य मिरवणूक काढली जाणार असून, या सर्व सोहळ्यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संजय पाटील यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे पदाधिकारी राजेंद्र कटारिया, सुरेखा गौरगोंडा, अरुणा शहा, राजू खोडा, पुष्पक हणमन्नावर, पद्मराज वैजन्नावर, सचिन पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.


Recent Comments