द बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’तर्फे आयोजित बेळगावच्या औद्योगिक क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या ‘बेलेक्स २०२६’ प्रदर्शनाचे आमदार अभय पाटील यांच्याहस्ते दिमाखदार उद्घाटन झाले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाचे मंत्री ललित गांधी उपस्थित होते. तसेच ‘अशोक आयरन ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक जयंत हुंबरवाडी आणि ‘गोवा चेंबर ऑफ कॉमर्स’च्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांची सन्माननीय उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, कर्नाटकातील उद्योगांच्या वाढीचा आढावा घेणे आवश्यक आहे. उद्योगांची प्रगती खुंटल्यास केवळ सरकारला जबाबदार धरण्यापेक्षा उद्योजकांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणणे गरजेचे आहे. “बियाँड बेंगळुरू” ही संकल्पना सध्या केवळ हुबळीपर्यंत मर्यादित असून, बेळगावमध्ये उद्योजकांच्या एकजुटीची कमतरता भासत आहे. आयटी पार्कसाठी विधानसभेत तीन वेळा प्रस्ताव मांडला असून, आता उद्योजकांनीही यासाठी सक्रिय पाठपुरावा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

उद्यमबाग हे बेळगावमधील हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. उद्योजकांनी शासनाची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन रोजगार निर्मिती केली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच, बेळगाव विमानतळाचा विस्तार करून आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू असून, येत्या काही दिवसांत बेळगाव ते दुबई थेट विमानसेवा सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुन्नोळी, सचिव सतीश कुलकर्णी, इव्हेंट चेअरमन उदय जोशी, को-चेअरमन विक्रम जैन आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments