Belagavi

मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Share

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर, कित्तूर आणि बैलहोंगल या तालुक्यांमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून मिरची उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा आरोप करत कर्नाटक राज्य रयत संघ महासंघाने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर, कित्तूर आणि बैलहोंगल आदी पट्ट्यात हिरव्या मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, बाहेरील जिल्ह्यांतून येणारे खासगी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या शेतात किंवा गावात जाऊन खरेदी केंद्र थाटतात. सुरुवातीला शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून हे व्यापारी नंतर वजनात माप मारतात आणि मिरचीची खरेदी करतात. धक्कादायक म्हणजे, यापूर्वी अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये न देताच पळ काढल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्याची नोंद पोलीस स्थानक आणि एपीएमसी कार्यालयातही आहे. थेट गावागावांत जाऊन अवैध खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत कर्नाटक राज्य रयत संघ महासंघाने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बीरप्पा देशनूर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले कि, गावागावांत केवळ एक-दोनच व्यापारी असल्याने ते आपसात संगनमत करून मिरचीचे दर पाडतात. यामुळे शेतकऱ्यांना बाजारातील स्पर्धात्मक भाव मिळत नाही. तसेच, हे व्यापारी सरकारला कोणताही कर किंवा शुल्क भरत नसल्याने सरकारी तिजोरीचेही मोठे नुकसान होत आहे. यामुळे गावागावांत बेकायदेशीरपणे चालणारे खासगी व्यापाऱ्यांची खरेदी केंद्रे बंद करावीत, मिरचीची खरेदी केवळ अधिकृत बाजारपेठेत जाहीर लिलावाद्वारे आणि पारदर्शक वजनासह व्हावी. विक्रीनंतर शेतकऱ्यांना तात्काळ पैसे मिळतील याची खात्री प्रशासनाने करावी.
तसेच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

यावेळी कर्नाटक राज्य रयत संघ महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: