Belagavi

बेळगाव जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांचे मोठे जाळे उघड!

Share

बेळगाव जिल्ह्यात सायबर भामट्यांनी फसवणुकीसाठी सर्वसामान्यांच्या बँक खात्यांचा वापर केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. ‘म्युल अकाउंट्स’ म्हणजेच भाड्याच्या खात्यांद्वारे हे मोठं जाळं विणलं असून, खुद्द सीआयडी कार्यालयाने जिल्ह्यातील तब्बल १४०० संशयास्पद बँक खात्यांची यादीच पोलिसांच्या हाती दिली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या खळबळजनक प्रकरणाचा खुलासा केला. भामटे सर्वसामान्य लोकांना विविध आमिषे दाखवून किंवा वेगवेगळ्या कारणांनी त्यांची बँक खाती उघडून घेतात आणि नंतर त्याचा वापर सायबर फसवणुकीचे पैसे वळवण्यासाठी केला जातो. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून तपासाचे चक्र वेगाने फिरू लागले आहे.

निपाणी येथील पाच आरोपींनी स्वतःच्या नावावर बँक खाती उघडून ती सायबर गुन्हेगारांना वापरण्यास दिली होती. धक्कादायक म्हणजे या केवळ ५ खात्यांच्या माध्यमातून देशभरात १४ गुन्हे दाखल असून, सुमारे ४६ लाख रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल झाली आहे.

दुसरीकडे, चिक्कोडी तालुक्यातील केरूर गावातील दोन आरोपींनी तर चक्क ओळखीच्याच लोकांचा विश्वासघात केला. त्यांचे पासबुक, एटीएम आणि सिम कार्ड हस्तगत करून सायबर फसवणुकीसाठी वापरले. या १५ बँक खात्यांद्वारे तब्बल ४२ लाख रुपयांचे व्यवहार झाले असून, देशाच्या विविध भागात या खात्यांशी संबंधित ६८ गुन्हे नोंदवले गेले आहेत.

रामदुर्ग तालुक्यातील सुरेबान मनिहाळमधील एका आरोपीनेही स्वतःच्या नावावर अनेक खाती उघडून ती गुन्हेगारांना भाड्याने दिली होती. या ४ खात्यांवर विविध राज्यांत ८ गुन्हे दाखल असून १४ लाख रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार झाले आहेत. यासंदर्भात बेळगावचे पोलीस अधिसखान के. रामराजन यांनी अधिक माहिती दिली आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या घरांची झडती सुरू आहे. अनोळखी व्यक्तीला आपले बँक खाते, एटीएम कार्ड किंवा सिम कार्ड देणे हा केवळ निष्काळजीपणा नसून, सायबर गुन्ह्यात सहभाग मानला जाऊ शकतो. त्यामुळे अशा फसवणुकीला बळी पडू नका आणि गुन्हेगारांना मदत करून कायदेशीर कारवाई ओढवून घेऊ नका, असा कडक इशारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.

Tags: