रायबाग तालुक्यातील कुडची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचली शहरात बेकायदेशीरपणे साठा करून ठेवलेले २९ रिकामे एलपीजी गॅस सिलिंडर पोलिसांनी जप्त केले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून विनापरवाना साठा करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत.
चिंचली येथील नामदेव पोळ याने गणितोटी मळ्यातील आपल्या शेडमध्ये कोणत्याही परवानगीशिवाय सिलिंडरचा साठा केल्याची माहिती कुडची पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने धाड टाकली असता तेथे २६ घरगुती वापराचे आणि ३ व्यावसायिक वापराचे असे एकूण २९ रिकामे सिलिंडर आढळून आले. पोलिसांनी हे सर्व सिलिंडर घटनास्थळावरून जप्त केले आहेत.
जप्त केलेले सिलिंडर अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपी नामदेव पोळ फरार झाला असून कुडची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईच्या वेळी कुडचीचे पोलीस उपनिरीक्षक प्रीतम नाईक, अन्न विभागाचे शिरस्तेदार शरणप्पा बागेवाडी, अन्न निरीक्षक विनायक बाटे यांच्यासह पोलीस कर्मचारी शेखर सासनूर आणि एस. डी. बनाज उपस्थित होते.


Recent Comments