राज्यातील देवदासी प्रथा आणि माजी देवदासींच्या पुनर्वसनाचा मुद्दा विधान परिषदेत गाजला. सदस्य हेमलता नायक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माजी देवदासींच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
विधान परिषदेत चर्चेदरम्यान हेमलता नायक यांनी देवदासी प्रथेबाबत चिंता व्यक्त केली. २००७ च्या सर्वेक्षणानुसार राज्यात ४६,६६० माजी देवदासी होत्या, तर सध्याच्या आकडेवारीनुसार ही संख्या २३,३९५ वर आली आहे. मात्र, अनेक भागांत अजूनही ही प्रथा अस्तित्वात असून सर्वेक्षण पूर्ण राज्यात न झाल्याने अनेक महिला मदतीपासून वंचित आहेत, असे नायक यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांनी माजी देवदासींना तातडीने अर्थसहाय्य देण्याची मागणी देखील लावून धरली.
यावर स्पष्टीकरण देताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, सरकारने आतापर्यंत १५ जिल्ह्यांमध्ये शास्त्रीय पद्धतीने तिसऱ्यांदा सर्वेक्षण पूर्ण केले आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अचूक आकडेवारी असणे आवश्यक असून त्यासाठी १०५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. सध्या २३,३९५ महिलांची माहिती उपलब्ध असली तरी सुमारे ९० हजार महिला अजूनही सर्वेक्षणापासून दूर असण्याची शक्यता आहे. या महिलांचे निवासस्थान आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी १५० कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
या संदर्भात समाज कल्याण मंत्र्यांशी प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच एक विशेष बैठक बोलावण्यात येणार असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. केवळ देवदासीच नव्हे, तर त्यांच्या मुलांच्या आणि नातवंडांच्या उज्वल भविष्यासाठी सरकार विशेष पॅकेज जाहीर करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


Recent Comments