Belagavi

अखिल भारतीय ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या राधिका डुकरेला रौप्य पदक

Share

बेळगावची प्रतिभावान ज्युडोपटू राधिका डुकरे हिने राष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान यश संपादन केले आहे. चंदीगड येथे आयोजित प्रतिष्ठित ‘अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ज्युडो चॅम्पियनशिप’मध्ये राधिकाने रौप्य पदक पटकावत कर्नाटकचा नावलौकिक उंचावला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील धामणे गावची रहिवासी असलेल्या राधिका डुकरे हिने १८ ते २२ मार्च दरम्यान चंदीगड विद्यापीठात पार पडलेल्या ७० किलो वजनी गटात राणी चन्नम्मा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत राधिकाने पंजाबची किरणदीप कौर आणि हरियाणाची कोमल यांचा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत गुजरातच्या रितुबेन वाजा विरुद्ध ‘इप्पान’ गुणाने विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. उपांत्य फेरीत यजमान चंदीगडच्या खुशीचा पराभव करून तिने अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम लढतीत एलएनआयपी विद्यापीठाच्या चानूविरुद्ध राधिकाने कडवी झुंज दिली, मात्र अल्प फरकाने तिचा पराभव झाल्याने तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

राधिका सध्या बेळगाव जिल्हा क्रीडा संकुलात एनआयएस प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि कुतुजा मुल्तानी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिच्या या यशात क्रीडा विभागाचे उपसंचालक श्रीनिवास बी. यांचे प्रोत्साहन आणि राधिकाची वैयक्तिक मेहनत कारणीभूत ठरली आहे. राधिकाच्या या कामगिरीमुळे धामणे गाव आणि राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, बेळगावमधील ज्युडो क्रीडा प्रकाराला नवी उभारी मिळाली आहे.

Tags: