बेळगाव तालुक्यातील उक्कड गावात १५ दिवसांच्या मुलीला विष देऊन मारल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी पित्याला काकती पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले विषही जप्त केले आहे.

उक्कड येथील प्रियांका या चिमुरडीच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी भीमराय याला काकती पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली आहे. १७ मार्च रोजी पत्नी शीला झोपेत असताना भीमरायने बाळाला विष पाजले आणि तेथून पळ काढला होता. मुलगी झाल्यामुळे भीमराय नाराज होता आणि त्याने बाळाला तिथेच सोडून घरी येण्यासाठी पत्नीवर वारंवार दबाव टाकला होता, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.
या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना पोलीस आयुक्त भूषण बोरासे यांनी सांगितले की, आरोपीने बाळाच्या तोंडात विष टाकून तिची हत्या केली आहे. गुन्ह्यात वापरलेल्या विषाचे अंश जप्त करण्यात आले असून आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, असे भूषण बोरासे यांनी म्हटले आहे.
पतीच्या कृत्याबाबत बोलताना पत्नी शीला यांनी गंभीर आरोप केले आहेत. पती भीमराय आणि त्याच्या घरच्यांना पहिल्यापासून मुलगाच हवा होता. मुलगी झाल्यामुळे त्यांनी छळ सुरू केला होता आणि काहीतरी तेल पाजून माझ्या पहिल्याच बाळाची हत्या केली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शीला यांनी व्यक्त केली.
घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेले मारुती पाटील यांनी सांगितले की, भीमराय घरी आला तेव्हा घरातून विचित्र वास येत होता. मात्र, कोणालाही काही संशय आला नाही. घरात कोणीही नसलेले पाहून त्याने संधी साधली आणि हे कृत्य करून तो पसार झाला, असे मारुती पाटील यांनी म्हटले आहे.
शीला यांच्या काकांनी या कुटुंबाच्या क्रूरतेचा पाढाच वाचला. बाळ जन्मल्यापासून सासरच्या मंडळींची वागणूक बदलली होती. माझ्या पुतणीला मुलगी झाली म्हणून त्यांनी तिचा स्वीकार केला नाही. जावयाने बाळाला विष पाजून ठार केले, मात्र ही माहिती देऊनही सासरचे कोणीही अंत्यसंस्काराला आले नाही. बाळाची जबाबदारी झेपत नव्हती तर आम्ही सांभाळले असते, मात्र या कृत्यासाठी दोषींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी शीला यांच्या काकांनी केली आहे.


Recent Comments