महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनी आज बेळगावमधील दळवी यांच्या निवासस्थानी भेट दिली.
सीमाभागातील ज्येष्ठ नेते आणि मए समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे गेल्या मंगळवारी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे सीमाभागात शोककळा पसरली होती. या पार्श्वभूमीवर, दळवी यांचे निकटवर्तीय असलेले जयंत पाटील आज शुक्रवारी थेट बेळगावमधील टिळकवाडी, सावरकर मार्ग येथील त्यांच्या घरी पोहोचले. दळवी यांचे पुत्र बुलंद दळवी आणि कुटुंबियांची भेट घेऊन पाटील यांनी त्यांचे सांत्वन केले तसेच दळवी यांच्या अखेरच्या क्षणांची माहिती घेऊन कुटुंबियांना धीर दिला.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख नेते मनोहर किणेकर, मालोजीराव अष्टेकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांशी जयंत पाटील यांनी चर्चा केली. सीमाभागातील सद्यस्थितीची माहिती घेतल्यानंतर, येत्या सोमवारी महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच भेट घडवून आणण्याचे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. या भेटीदरम्यान मए समितीचे ज्येष्ठ आणि युवा पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments