kitturu

दोडवाडमधील छायाचित्रकार महेश उजनीमठ हत्येतील आरोपीला अटक

Share

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील दोडवाड गावात घडलेल्या फोटोग्राफर महेश उजनीमठ हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

स्त्यावरून येण्या-जाण्याच्या क्षुल्लक वादातून झालेल्या या हत्येप्रकरणी दोडवाड पोलिसांनी मुख्य आरोपी रुद्रय्या याला अटक केली आहे.

कित्तूर तालुक्यातील दोडवाड गावात ३३ वर्षीय फोटोग्राफर महेश उजनीमठ यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण गावात मोठी खळबळ उडाली होती. व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या महेश यांची त्यांचाच नातेवाईक असलेल्या रुद्रय्या उजनीमठ याने वादातून हत्या केली होती.

या हत्येमागील कारण अत्यंत क्षुल्लक होते. महेश यांनी संबंधित रस्त्यावरून ये-जा करू नये, यावरून आरोपी रुद्रय्या नेहमी वाद घालत असे. याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात रुद्रय्याने धारदार शस्त्राने वार करून महेश यांची हत्या केली.

घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी बेळगावचे पोलीस अधीक्षक रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोडवाड पोलिसांनी कारवाई करत मारेकरी रुद्रय्याला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी दोडवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Tags: