Vijayapura

​विजापूरमध्ये वीज कोसळून १३ मेंढ्यांचा मृत्यू

Share

​विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यात वळीव पावसाने हजेरी लावली असून, अलुगुंर गावात वीज कोसळल्याने १३ मेंढ्या दगावल्या आहेत.

​विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील अलुगुंर गावातील बसवराज माकोंड यांच्या मालकीच्या मेंढ्या आणि शेळ्या शेतात चरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह वळीव पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, जनावरांच्या कळपावर वीज कोसळल्याने १३ मेंढ्या आणि शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.

​या घटनेमुळे मेंढपाळ बसवराज माकोंड यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विजेचा तडाखा इतका तीव्र होता की, कोणतीही हालचाल करण्याची संधी मिळण्यापूर्वीच ही सर्व जनावरे दगावली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असून नुकसानग्रस्त मेंढपाळाला तातडीने सरकारी मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

​याप्रकरणी देवरहिप्परगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटनेची नोंद करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला असून, पुढील अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Tags: