Belagavi

बेळगावमध्ये भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

Share

बेळगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार गारपिटीमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. व्यवसायानिमित्त बाहेर पडलेल्या दाम्पत्यावर भिंत कोसळल्याने ही दुर्घटना ओढवली.

बेळगाव मधील होसूर गावात पावसाच्या तडाख्यामुळे भिंत कोसळून ३४ वर्षीय परवीन बेपारी या महिलेचा मृत्यू झाला. वंटमुरी येथील रहिवासी असलेल्या परवीन आणि त्यांचे पती शरीफ बेपारी हे दुचाकीवरून कोंबड्या विक्रीसाठी जात होते. यावेळी अचानक सुरू झालेल्या वादळी पावसापासून वाचण्यासाठी हे दाम्पत्य एका जुन्या पडक्या भिंतीच्या आडोशाला थांबले होते. दुर्दैवाने ती भिंत अंगावर कोसळल्याने परवीन यांचा जागीच मृत्यू झाला, तर शरीफ बेपारी हे किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमी शरीफ बेपारी यांच्यावर सध्या बेळगाव मधील बिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काकती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेमुळे बेपारी कुटुंबावर शोककळा पसरली असून, सरकारने मृतांच्या वारसांना तात्काळ योग्य ती मदत द्यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

Tags: