अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीच्या मुद्द्यावरून केवळ राज्य सरकारकडे बोट दाखवणे चुकीचे असून केंद्र सरकारनेही या विषयात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले आहे.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार दर्शन पुट्टण्णय्या यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले की, अंगणवाडी सेविकांना सर्वाधिक मानधन देणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या सेविकांना केंद्राकडून २७०० रुपये तर राज्याकडून ९८०० रुपये मानधन दिले जात असून, केंद्र सरकारने मानधनात वाढ केल्यास राज्य सरकारही सकारात्मक पाऊल उचलेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
याचवेळी त्यांनी ५ हजार अंगणवाड्यांमध्ये ‘सरकारी मॉन्टेसरी’ सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. मुलांच्या पौष्टिक आहारासोबतच दर्जेदार शिक्षणावर भर देण्याचा सरकारचा उद्देश असून, अंगणवाड्यांमध्ये कार्यरत असलेल्या उच्चशिक्षित १७ हजार शिक्षिकांच्या अनुभवातून शिक्षणाचा दर्जा सुधारला जाईल, असेही हेब्बाळकर यांनी यावेळी नमूद केले.


Recent Comments