Belagavi

बेळगावच्या केएलई रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण यशस्वी

Share

बेळगावमधील केएलई शताब्दी चॅरिटेबल रुग्णालयात गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या एका रुग्णावर यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या ६७ वर्षीय पुरुष रुग्णाला मधुमेहामुळे मूत्रपिंडाचा गंभीर आजार झाला होता. वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णाची प्रकृती खालावल्याने तातडीने किडनी प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला. रुग्णाच्या ४७ वर्षीय मुलीने स्वतःची किडनी दान करून वडिलांचे प्राण वाचवले आहेत. नातेवाईकांनी केलेल्या अवयवदानाचे महत्त्व या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित झाले असल्याचे डॉ. राजेंद्र नेरली यांनी म्हटले.

युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. बी. नेर्ली यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. नेफ्रोलॉजी विभागाचे डॉ. अंजनेय यादूर आणि भूलतज्ज्ञ डॉ. सुरेश एस. एन. व डॉ. निलीवेगी यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. शस्त्रक्रियेनंतर नवीन किडनीने तात्काळ कार्य करण्यास सुरुवात केली असून रुग्णाच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे.

सध्या रुग्ण आणि किडनी देणारी मुलगी दोघांचीही प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. किडनी प्रत्यारोपणामुळे गंभीर रुग्णांना दीर्घकालीन डायलिसिसपासून मुक्ती मिळते आणि त्यांचे जीवनमान सुधारते, असे डॉक्टरांनी यावेळी नमूद केले. या यशस्वी शस्त्रक्रियेत डॉ. अमेय पठाडे, डॉ. शिशिर देवराज आणि डॉ. दर्शन यांचाही समावेश होता.

Tags: