Belagavi

बेळगाव : बसवण कुडची येथे इंगळ्यांचा सोहळा उत्साहात संपन्न

Share

बेळगावमधील बसवण कुडची येथे श्री बसवाण्णा, श्री कलमेश्वर आणि श्री ब्रह्मदेव यात्रेनिमित्त आयोजित ‘इंगळ्या’ कार्यक्रम मंगळवारी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात पार पडला. वळिवाच्या पावसाने हजेरी लावूनही भाविकांच्या उत्साहात कोणतीही कमतरता भासली नाही.

बसवण कुडची येथील ही यात्रा इंगळ्यांची यात्रा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असून बेळगावसह आसपासच्या गावांतील हजारो भाविक येथे दाखल झाले होते. मंगळवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली, मात्र त्याच वेळी वळिवाच्या पावसाने या भागाला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे यात्रेला येणाऱ्या अनेक भाविकांना रस्त्यातच तासन्तास अडकून पडावे लागले.

पावसाची तमा न बाळगता सायंकाळी सहाच्या सुमारास पारंपरिक धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर पेटत्या इंगळ्यांतून भाविकांनी धावण्यास प्रारंभ केला. हा थरारक सोहळा पाहण्यासाठी मंदिर परिसर चोहोबाजूंनी भाविकांनी तुडुंब भरला होता. सायंकाळनंतर गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाल्याने वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. यावेळी रात्री उशिरापर्यंत गावातील घरोघरी पाहुण्यांची रेलचेल दिसून आली.

Tags: