Belagavi

बेळगावमध्ये गुढीपाडवा आणि रमजाननिमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांचा इफ्तार मेळावा

Share

सीमावर्ती बेळगावमधील मार्केट पोलीस ठाण्याच्या आवारात गुढीपाडवा आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष इफ्तार मेळावा आणि शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावच्या मार्केट पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित या इफ्तार आणि शांतता बैठकीत मार्केट विभागाचे एसीपी संतोष सत्यनायक यांनी सर्वांचे स्वागत केले. गेल्या २८ दिवसांपासून नागरिकांनी पोलीस प्रशासनाला उत्तम सहकार्य केले असून, मागील वर्षापेक्षा यंदा अधिक शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात सण पार पडत आहेत. प्रशासकीय हितासाठी काही निर्णय घेतले जातात, ते लक्षात न ठेवता सर्वांनी गुण्यागोविंदाने सण साजरे करावेत, असे आवाहन संतोष सत्यनायक यांनी केले.

यावेळी उपस्थित समाजातील मान्यवरांनी बेळगाव पोलीस जनस्नेही सेवा बजावत असल्याचे सांगून डीसीपी नारायण बरमणी यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. रमजानचा महिना आतापर्यंत अत्यंत शांततेत पार पडल्याबद्दल अन्य पोलीस अधिकाऱ्यांनीही उपस्थितांचे आभार मानले. येत्या दोन-तीन दिवसांतील सण देखील अशाच प्रकारे शांततेत साजरे करावेत, अशी विनंती पोलिसांनी केली.

डीसीपी नारायण बरमणी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही रमजानचा सण शांततेत साजरा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडींचे सावट आपल्या शहरावर पडू नये, याची दक्षता घेऊन सर्वांनी मिळूनमिसळून सण साजरा करावा, असे आवाहन नारायण बरमणी यांनी केले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधव आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Tags: