Belagavi

बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्भेळ यश संपादन करत सत्ता काबीज केली आहे. काँग्रेसने दिलेल्या कडव्या आव्हानानंतरही भाजपने आपले संख्याबळ सिद्ध करत महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे यशस्वीपणे मिळवली आहेत.

बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी विणकर समाजाच्या प्रीती कामकर आणि उपमहापौरपदी लिंगायत समाजाचे हनुमंत कोंगाळी यांची निवड झाली आहे. प्रादेशिक आयुक्त जानकी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत भाजपच्या उमेदवारांना प्रत्येकी ३९ मते मिळाली. याउलट, काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार खुर्शिदा मुल्ला आणि उपमहापौरपदाचे उमेदवार मोदिनसाब मत्तेवाले यांना केवळ २० मतांवर समाधान मानावे लागले. भाजपने ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवल्याने प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली.

या वेळच्या निवडणुकीत भाजपने केवळ राजकीय समीकरणेच नव्हे, तर प्रादेशिक अस्मितेचाही विचार केला आहे. निवड झालेले दोन्ही लोकप्रतिनिधी कन्नड भाषिक असल्याने कन्नड संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. निवडणूक प्रक्रियेत भाजपचे आमदार प्रामुख्याने उपस्थित होते, तर खासदार आणि विधान परिषद सदस्यांची अनुपस्थिती यावेळी दिसून आली. असे असले तरी, दोन्ही प्रतिष्ठेच्या जागा जिंकून भाजपने बेळगाव महापालिकेवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Tags: