Khanapur

खानापूरमधील कवळे मठाच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप

Share

खानापूरमधील कवळे मठाच्या मालकीच्या जमिनीवर काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाचे श्री शिवानंद सरस्वती स्वामीजी यांनी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.

खानापूर मधील कवळे मठाच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक ३०, ३८, ४० आणि ४५ या जमिनीबाबत जुन्या भाडे करारावरून वाद सुरू आहे. १९७० मध्ये झालेल्या न्यायालयीन तडजोडीनुसार, ३१ डिसेंबर २०१७ रोजी भाडे मुदत संपल्यानंतर ही जमीन मठाकडे हस्तांतरित होणे अपेक्षित होते. त्यानुसार ६ फेब्रुवारी २०२१ रोजी जमिनीचा ताबा मठाला मिळाला असून, सध्या तिथे मठाच्या वतीने शेती व बागायती कामे सुरू आहेत असे श्री शिवानंद सरस्वती स्वामीजी यांनी म्हटले.

सध्या हे प्रकरण खानापूर दिवाणी न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात प्रलंबित आहे. न्यायालयाने या जमिनीवर कोणत्याही त्रयस्थ पक्षाने हक्क सांगू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. असे असतानाही कंदी रविकुमार यांनी ५० ते ६० जणांसह बेकायदेशीरपणे प्रवेश करून तिथे ‘भीमसेना अध्यक्ष’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक लावले आहेत. यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत असे श्री शिवानंद सरस्वती स्वामीजी यांनी म्हटले.

या अतिक्रमणाबाबत स्थानिक आणि जिल्हा पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. राजकीय दबावामुळे प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा संशय मठाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे देशभरातील भाविकांमध्ये संताप असून, न्याय न मिळाल्यास खानापूरमध्ये मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने याप्रकरणी निष्पक्ष तपास करून तात्काळ अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

न्यायालयीन प्रक्रियेचा आदर न करता अशा प्रकारे अतिक्रमण करणे निषेधार्ह आहे. पोलिसांनी तातडीने दखल न घेतल्यास संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल अशी प्रतिक्रिया शरद केशकामत यांनी व्यक्त केली.

या पत्रकार परिषदेला वकील प्रद्युम्न भाटे, पद्मा हळ्याळी, जयंत खासनीस, किशोर नाईक यांच्यासह मठाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Tags: