२०२५-२६ शैक्षणिक वर्षाच्या दहावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी येथे शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आल्याचे शिक्षण विभागाचे उपसंचालक सीताराम आर.एस. यांनी सांगितले.
चिक्कोडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले की, जिल्हयातील २४० सरकारी, १५२ अनुदानित आणि २२९ विनाअनुदानित माध्यमिक शाळांमधील एकूण ४५,५९८ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये २४,१०० मुले आणि २१,४९८ मुलींचा समावेश आहे. एकूण १३१ परीक्षा केंद्रांपैकी ३९ क्लस्टर आणि ९२ नॉन क्लस्टर केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सर्व १३१ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आल्याचे सीतारामू आर.एस. यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक मुख्य अधीक्षक, एक अभिरक्षक आणि मोबाईल स्वाधीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून जिल्हा स्तरावर ४ आणि तालुका स्तरावर २४ अशी एकूण २८ भरारी पथके (स्कॉड) तैनात करण्यात आली आहेत. एकूण २,१३४ खोल्यांमध्ये सीसीटीव्हीची नजर असेल. तसेच प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी ४८ मार्ग निश्चित करण्यात आले असून वेब कास्टिंग निरीक्षकांचीही नेमणूक करण्यात आली असल्याचे सीतारामू आर.एस. यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला डायटचे प्राचार्य संजू हुल्लोळी, चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा नोडल अधिकारी हरिदास खाडे आणि राजू देवरुषी उपस्थित होते.


Recent Comments