सीमाभागातील मराठी अस्मितेचा बुलंद आवाज आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे सीमाप्रांतातील मराठी चळवळीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून संपूर्ण सीमाभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दीपक दळवी हे प्रामाणिकपणा, निष्कलंक चारित्र्य आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने सीमाभागातील प्रत्येक मराठी माणूस पोरका झाला असून चळवळीतील कार्यकर्त्यांचे मोठे प्रेरणास्थान हरपले आहे. संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.
प्रशासनासमोर सीमाप्रश्नावर अभ्यासू, ठाम आणि प्रभावी भूमिका कशी मांडावी, याचा आदर्श दळवींनी आपल्या कृतीतून घालून दिला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली सीमालढ्याला एक नवी दिशा आणि बळ मिळाले होते. केवळ एक नेता म्हणून नव्हे, तर कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान म्हणून दीपक दळवी यांच्याकडे पाहिले जात असे. आंदोलनाच्या काळात कार्यकर्त्यांना धीर देणे आणि त्यांना संघर्षासाठी सज्ज करणे, यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या एका शब्दाखातर हजारो तरुण चळवळीत स्वतःला झोकून देत असत. त्यांच्या जाण्याने चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
दीपक दळवी यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ७.३० वाजता बेळगावमधील शहापूर स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहेत.


Recent Comments