Belagavi

बेळगावमध्ये महिला शक्तीचा जागर; कर्तृत्ववान महिलांचा विशेष गौरव

Share

बेळगावमधील चन्नम्मा चौकातील कन्नड साहित्य भवनमध्ये महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले असून, या सोहळ्याने महिला शक्तीचे अनोखे दर्शन घडले.

कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी कल्याणकारी संघटना आणि खानापूरमधील कर्नाटक राज्य सरकारी दिव्यांग कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वनिता बी. मेटगुडल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बेळगाव ग्रामीणचे क्षेत्र शिक्षणाधिकारी अंजनेय आर. के. यांनी गुणवंत महिलांना पुरस्कारांचे वितरण केले. महिलांनी संघटित होऊन लढा दिला तरच शोषणमुक्त समाज निर्माण करणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.

यरगट्टी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजशेखर बिरादार यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष व्याख्यान दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश सकण्णवर होते, तर बेळगाव ग्रामीण शारीरिक शिक्षण शिक्षणाधिकारी एस. एन. भद्र यांनी प्रास्ताविक केले. क्षेत्र समन्वयाधिकारी डॉ. दानम्मा झळकी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक तथा कर्नाटक साहित्य परिषदेचे सचिव एम. वाय. मेणसिनकाई, राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. सुनील पलीट, सावित्रीबाई कला शिक्षिका संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नसीन बानू काशीमनवर, प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर कोलकार आणि दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल यकाजनवर उपस्थित होते. विविध तालुक्यांतील संघटनेचे पदाधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Tags: