हुक्केरी आणि यमकनमर्डी कार्यक्षेत्रात १८ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती क्षेत्र शिक्षणाधिकारी प्रभावती पाटील यांनी दिली.

हुक्केरी आणि यमकनमर्डी क्षेत्रातील १९ केंद्रांवर एकूण ७,२०३ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये ६,५५४ नियमित आणि ६४९ जुन्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आले आहेत. मुख्य कार्यालय आणि जिल्हा प्रशासन प्रत्येक केंद्रावर लक्ष ठेवणार असून, केवळ अधिकृत कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाईल. नियमांचे उल्लंघन करून केंद्रात प्रवेश करणाऱ्या बाहेरील व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रभावती पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी हुक्केरी तालुक्यात सराव परीक्षा आणि विशेष प्रशिक्षण गट तयार करून मार्गदर्शन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांवर पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांसह वैद्यकीय मदत आणि बसची सोय करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ५५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रभावती पाटील यांनी दिली.
तहसीलदार बलराम कट्ठीमनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परीक्षा कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी टी. आर. मल्लाडद, समाज कल्याण सहाय्यक संचालक गुरुशांत पावटे, ए. एस. पद्मण्णवर आणि एम. डी. बडिगेर उपस्थित होते.


Recent Comments