Belagavi

बेळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वळीव पावसाची हजेरी

Share

बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वळीव पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या असह्य उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या बाजारपेठेत गुढीपाडवा, रामजान आणि लग्नसराईनिमित्त खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. अशातच दुपारी अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिक आणि व्यावसायिकांची काही काळ धांदल उडाली. बेळगाव शहर – परिसर तसेच ग्रामीण भागात गारांचा वर्षाव झाल्याने रस्त्यावर गारा साचल्याचे पाहायला मिळाले. गेल्या आठवडाभरापासून तापमानात मोठी वाढ झाली होती, मात्र आज झालेल्या वळीव पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. शहरातील विविध भागांत साचलेल्या गारा वेचण्यासाठी लहान मुलांसह नागरिकांनी गर्दी केली होती.

सकाळी ढगाळ वातावरण राहिल्यानंतर दुपारी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठेतील खरेदीवर काही काळ परिणाम झाला असला तरी उकाड्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना या पावसामुळे सुखद दिलासा मिळाला आहे.

Tags: