विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पुकारलेल्या आंदोलनादरम्यान आज पोलीस आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले .

बेळगावमधील कित्तूर चन्नम्मा चौकात आज एबीव्हीपीच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारमधील रिक्त पदांची भरती, वयोमर्यादा शिथिल करणे, विद्यापीठांना निधी मंजूर करणे आणि प्रलंबित शिष्यवृत्तीचे त्वरित वाटप करावे, या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून सरकारचा निषेध नोंदवला.

तसेच परीक्षेचे निकाल आणि गुणपत्रिका वेळेवर मिळाव्यात, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. परीक्षेच्या निकालात होणारा विलंब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी घातक असल्याची प्रतिक्रिया सचिन हिरेमठ यांनी व्यक्त केली.

आंदोलनादरम्यान चन्नम्मा चौकातील मुख्य रस्त्यावरच ठिय्या मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मज्जाव केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन ओढाताण झाली. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.
या आंदोलनामुळे शहराच्या मुख्य परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या आंदोलनात सचिन हिरेमठ, पनीराघवेंद्र देसाई, कुशल गोधगेरी, यल्लाप्पा बम्मनाली, दर्शन माषण्णवर, शिवय्या मठपती, साई भोसले, नागराज हंजी, प्रथमगौडा पाटील, महांतेश, बालाजी जवळकर आणि सौरभ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments