Belagavi

बेळगावमध्ये २४ मार्चपासून भव्य औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन

Share

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने येत्या २४, २५ आणि २६ मार्च २०२६ रोजी बेळगावमध्ये भव्य औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबरचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुनोळी आणि इव्हेंट चेअरमन उदय जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

उद्यमबाग येथील बेळगाव फाऊंड्री क्लस्टरमध्ये ‘BELEX 2026’ या नावाने हे औद्योगिक आणि व्यापारी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून बेळगावसह उत्तर कर्नाटकातील उत्पादन, व्यापार, शिक्षण, कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील क्षमतांची व्यापक ओळख करून देण्याचा उद्देश असल्याचे प्रभाकर नागरमुनोळी यांनी सांगितले.

स्थानिक उद्योगांची ताकद प्रदर्शित करण्यासोबतच विविध उत्पादने आणि सेवांच्या प्रसिद्धीसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी बेळगावसह गोवा, कोल्हापूर आणि हुबळी-धारवाडमधील उद्योजकांनाही आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती उदय जोशी यांनी दिली.

या प्रदर्शनासाठी ८५ पेक्षा जास्त स्टॉल्स उभारण्यात येणार असून, यामुळे उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील व्यक्तींना परस्परांशी संवाद, नेटवर्किंग आणि व्यवसाय विस्ताराची उत्तम संधी मिळणार आहे. ‘BELEX 2026’ हे प्रामुख्याने ‘B2B’ (बिझनेस-टू-बिझनेस) स्वरूपाचे प्रदर्शन असून स्थानिक उद्योगांना नवसंजीवनी देणे आणि त्यांच्या वाढीला चालना देणे हा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रदर्शनाचा उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बीसीसीआयच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला बीसीसीआय सचिव सतीश कुलकर्णी, विक्रम जैन, संजीव कत्तीशेट्टी, स्वप्नील शहा, मनोज मत्तीकोप्प, वैभव वेर्णेकर, सुधीर चौगुले, एम. के. हेगडे आदी उपस्थित होते.

Tags: