बेंगळुरूमध्ये जैन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यासाठी आवश्यक जागा खरेदी करण्यास सदस्यांनी एकमताने संमती दिली असून, या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांची निवासाची गैरसोय दूर होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जितेंद्रकुमार एस. यांनी दिली.

कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथील जैन समाज संघटनेच्या समुदाय भवनात मंगळवारी कर्नाटक जैन असोसिएशनच्या राज्य मठाची विशेष सभा पार पडली. या सभेत वसतिगृह उभारणीसाठी जागा खरेदी करण्याचा ठराव सदस्यांनी एकमताने मंजूर केला. कर्नाटक जैन असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा उगार येथील श्री पद्मावती मंदिराचे प्रमुख शीतलगौडा पाटील यांनी प्रास्ताविक केले.
बेंगळुरू येथील जैन वसतिगृहाच्या विस्तारासाठी असोसिएशनने ६.५० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, यासाठी २५६० चौरस फूट क्षेत्राची इमारत खरेदी केली जाणार आहे. सध्याच्या निवासाची आणि भोजनाची जागा अपुरी पडत असल्याने, वाढत्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून यासाठी ४ कोटींच्या अतिरिक्त निधीची गरज आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी दानशूर व्यक्ती, संस्था आणि माजी विद्यार्थ्यांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन अध्यक्ष जितेंद्र कुमार एस. यांनी केले आहे.
या विशेष सभेला कर्नाटक जैन असोसिएशनचे उपाध्यक्ष राजकीर्ती, शीतलगाडा पाटील, सहसचिव डॉ. नीरज नागेंद्रकुमार, कोषाध्यक्ष महावीर, निमंत्रक उत्तम पाटील (चिक्कोडी), कोमल ब्रह्मदेवय्या (बेंगळुरू), जंबुकुमार बागेवाडी (विजापूर), जिनेंद्र कुमार, जिनेंद्र एम.एम. (बेंगळुरू), दीपक पंडित (कलुबुर्गी), दिलीप कुमार (बीदर), पुष्पक हनुमण्णवर (बेळगाव), बाहुबली कडकोळ (बागलकोट), बाहुबली परमगौडर (रायबाग), वज्रकुमार एस.ए. (हावेरी) आणि अथणी तालुक्यातील अरुण एलगुदरी, ए.सी. पाटील, राजू नाडगौडा यांसह समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments