Belagavi

मराठी अस्मितेसाठी सीमाभागात मराठी सन्मान यात्रेचा एल्गार

Share

सीमाभागातील मराठी अस्मिता आणि भाषिक हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे राजहंसगड ते येळ्ळूर अशी भव्य ‘मराठी सन्मान यात्रा’ काढण्यात आली. या यात्रेच्या समारोपप्रसंगी झालेल्या सभेत वक्त्यांनी मराठी बांधवांना एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागातर्फे रविवारी या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. येळ्ळूरमधील जाहीर सभेत बोलताना व्याख्याते नंदकुमार गोरुले यांनी सीमालढ्याचा ७० वर्षांचा इतिहास मांडला. न्याय मागून मिळत नसेल तर तो लढ्याच्या बळावर मिळवावा लागेल आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी समाजाने सदैव सज्ज राहावे, असे आवाहन नंदकुमार गोरुले यांनी केले. मराठी भाषा टिकवण्यासाठी समाजात मतभेद नसावेत आणि भाषेचे जतन करणे ही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण भारतातील संस्कृतीचे रक्षण केले असून सीमाभाग ऐतिहासिकदृष्ट्या महाराष्ट्राचाच भाग आहे. त्यामुळे येथील मराठी माणसाचे हक्क अबाधित राहणे गरजेचे असल्याचे मत नंदकुमार गोरुले यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना शुभम शेळके यांनी यात्रेच्या उद्देशावर प्रकाश टाकला. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही, मात्र मराठीवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, अशी भूमिका शुभम शेळके यांनी मांडली.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी सीमाभागात जाणीवपूर्वक कानडीकरण होत असल्याचा आरोप केला. न्यायालयाच्या आदेशांचे पालन होत नसल्याने मराठी समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा मनोहर किणेकर यांनी दिला. सभेपूर्वी माजी आमदार मनोहर किणेकर आणि नंदकुमार गोरुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर प्रकाश मरगाळे, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, ॲड. अमर येळ्ळूरकर, मालोजी अष्टेकर, ॲड. सुधीर चव्हाण, विकास कलगटगी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले, तर दुद्दप्पा बागेवाडी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags: