State

अथणी कॉलेजमधील समस्यांवरून लक्ष्मण सवदी यांनी सरकारला धरले धारेवर

Share

अथणी येथील शासकीय कॉलेजमधील अपुऱ्या सोयीसुविधा आणि रखडलेल्या वसतिगृहाच्या कामावरून आमदार लक्ष्मण सवदी यांनी आज विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अथणीच्या शैक्षणिक विकासाचा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. अथणी कॉलेजमध्ये मूलभूत सुविधा आणि वसतिगृहाची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात ८० कोटी रुपये मंजूर झाले असतानाही आर्थिक विभागासोबत बैठक का घेतली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इमारतीचे काम पूर्ण न झाल्यास तिसऱ्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे कठीण होईल, अशी नाराजी लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केली.

या प्रश्नावर उत्तर देताना पशुसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांनी कॉलेजचे कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू असल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणे अत्यंत आवश्यक असून त्याबाबत आर्थिक विभागाशी चर्चा करण्यात आली आहे. लवकरच या कॉलेजसाठी सुसज्ज वसतिगृह बांधून दिले जाईल, असे आश्वासन के. व्यंकटेश यांनी दिले.

Tags: