रायबाग तालुक्यातील हारूगेरी येथे झालेल्या धाडसी घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, आंतरराज्य टोळीला अटक करण्यात आली आहे.

विद्यानगरमधील बंद घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या या टोळीकडून मुद्देमाल जप्त केल्याची माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.
हारूगेरीमधील विद्यानगर येथे ६ आणि ७ फेब्रुवारी दरम्यान अभिषेक सुरेश पांडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी हातसाफ केला होता. या चोरीत २८ तोळे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीचे पूजेचे साहित्य असा एकूण २३ लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याच काळात सरस्वती संजू बडिगेर यांच्या घरातूनही २.५ तोळे सोने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती, ज्याबाबत हारूगेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून पोलिसांनी आंतरराज्य चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेले दागिने आणि चांदीच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. या टोळीने अन्य कुठे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी सांगितले.
पोलिसांच्या या कामगिरीमुळे हारूगेरी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांनी आपल्या घराच्या सुरक्षेबाबत सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने कळवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींची सध्या कसून चौकशी सुरू आहे.


Recent Comments