Belagavi

बेळगाव जिल्ह्यातील भूजल पातळीत सुधारणा; खासदार ईरण्णा कडाडी

Share

केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानांतर्गत बेळगाव जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या १,६७६ चेक डॅम्ससह एकूण १.१ लाख जलसंधारणाच्या कामांमुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत मोठी सुधारणा झाल्याची माहिती राज्यसभेचे खासदार ईरण्णा कडाडी यांनी दिली.

दिल्लीतील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी ही माहिती दिली आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशनात बेळगाव जिल्ह्यातील भूजल व्यवस्थापनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला मंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. जिल्ह्यातील गेल्या दहा वर्षांच्या सरासरीची तुलना करता, सुमारे ८१ टक्के विहिरींच्या पाणी पातळीत सकारात्मक बदल झाला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ९७ टक्के विहिरींमध्ये केवळ ० ते १० मीटर खोलीवर पाणी उपलब्ध होत असून ही अत्यंत आशादायक बाब असल्याचे खासदार ईरण्णा कडाडी यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ‘सुरक्षित’ तालुक्यांचे प्रमाण २०१७ मधील ४० टक्क्यांवरून २०२५ मध्ये ५३.३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. याउलट, अतिवापर होणाऱ्या तालुक्यांचे प्रमाण ३० टक्क्यांवरून १३.३ टक्क्यांपर्यंत खाली आले असून, सध्या केवळ बैलहोंगल आणि सौंदत्ती हे दोनच तालुके या श्रेणीत आहेत. अटल भूजल योजनेअंतर्गत अथणी आणि रामदुर्ग तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींमध्ये १,५३६ बोअरवेल पुनर्भरण युनिट्स उभारण्यात आले असून ३१ पंचायतींमध्ये पाण्याची पातळी सुधारली आहे.

‘पर ड्रॉप मोर क्रॉप’ योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी केंद्र सरकारकडून मोठे अनुदान दिले जात आहे. यासोबतच राज्य सरकारच्या विशेष शाश्वत पीक व्यवस्थापन योजनेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील १,००० हेक्टर ऊस क्षेत्रासाठी नवीन सूक्ष्म सिंचन योजना लागू करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली असल्याचे खासदार ईरण्णा कडाडी यांनी स्पष्ट केले.

Tags: