भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन सुधारित कायद्यामुळे बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठी खळबळ उडाली आहे. सलग १० वर्षे संचालक म्हणून काम केलेल्या सदस्यांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आरबीआयच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सहकारी बँकांमध्ये संचालकांना सलग १० वर्षांहून अधिक काळ पदावर राहता येत नाही. हा कायदा लागू असतानाही बेळगाव जिल्हा बँकेत नियमांचे उल्लंघन करून जुन्याच संचालकांना संधी देण्यात आल्याचा गंभीर आरोप भीमप्पा गडाद यांनी केला आहे. राजकीय दबावापोटी अधिकारी या कायद्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह रमेश कत्ती, लक्ष्मण सवदी, महांतेश दोड्डगौडर, अरविंद पाटील, नीलकंठ कप्पलगुद्दी आणि अप्पासाहेब कुलुगोड हे नियमानुसार अपात्र ठरायला हवेत, असे भीमप्पा गडाद यांनी सांगितले. या संदर्भात मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे तक्रार केली असून, महिन्याभरात कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा गडाद यांनी दिला आहे.


Recent Comments