Belagavi

बेळगावमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ; निकृष्ट अन्नाचा पुरवठा

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा खालावला असून, चव्हाट गल्ली परिसरात कर्मचाऱ्यांना चक्क सडलेली आणि पिवळी पडलेली अंडी देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकारामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बेळगावमधील चव्हाट गल्ली भागात कार्यरत असलेल्या ६९ स्वच्छता कर्मचाऱ्यांना जेवणात अत्यंत निकृष्ट दर्जाची अंडी पुरवण्यात आली. ही अंडी उकडल्यानंतर पूर्णपणे पिवळी पडली असून त्यातून उग्र दुर्गंधी येत होती. महापालिका अधिकाऱ्यांच्या देखरेखीच्या अभावामुळे कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांच्या जिवाशी असा खेळ सुरू असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

या निकृष्ट दर्जाच्या अन्नाबाबत कंत्राटदाराला विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चुलीवर जास्त वेळ अंडी उकडल्यामुळे त्यांचा रंग बदलला असावा, असा अजब दावा त्याने केला आहे. जनावरेही खाणार नाहीत अशा प्रकारचे निकृष्ट अन्न मानवी वापरासाठी देऊन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण केला जात आहे.

महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे. कष्टकरी कर्मचाऱ्यांना सकस आणि प्रकृतीस पूरक असे दर्जेदार जेवण मिळावे, अशी आग्रही भूमिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

Tags: