उत्तर कर्नाटकचा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, काँग्रेस सरकार हे दिलेला शब्द पाळणारे सरकार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बागलकोट येथे केले.


बागलकोट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन संस्थेचे भूमिपूजन, विविध विकासकामांचे उद्घाटन आणि कृष्णा वरदवाहिनी टप्पा-३ अंतर्गत बाधित शेतकर्यांना जमीन भरपाई वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, “बागलकोटमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी दिवंगत आमदार एच. वाय. मेटी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज हे स्वप्न साकार होत आहे. हे भूमिपूजन पोटनिवडणुकीमुळे होत नसून २०२५ च्या अर्थसंकल्पातील घोषणेनुसार होत आहे. आमचे सरकार प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करत आहे.”

भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, “गॅरंटी योजनांमुळे विकासकामांना पैसा नाही, हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. आम्ही आतापर्यंत गॅरंटी योजनांवर १.२२ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत आणि विकासासाठीही निधी कमी पडू दिलेला नाही. भाजप सत्तेत असताना त्यांनी जिल्ह्यासाठी हे महाविद्यालय का दिले नाही?”

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यावेळी सांगितले की, कृष्णा वरदवाहिनी (UKP) टप्पा-३ च्या बाधितांना जमीन भरपाई देण्यासाठी यावर्षी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेजारील राज्यांनी विरोध केला तरीही आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बांधील आहोत. यावेळी त्यांनी बागलकोट पोटनिवडणुकीत मेटी कुटुंबाला पाठिंबा देण्याचे आवाहनही केले.
या कार्यक्रमाला जिल्हा पालकमंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments