बेळगाव शहरात इराणचे नेते अली खामनेई यांची वाढती छायाचित्रे पोलीस विभागाने तातडीने हटवावीत. अन्यथा, प्रति-प्रतिमा लावण्याचा पवित्रा श्रीराम सेना घेईल, असा इशारा श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिला.

बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुतालिक यांनी ‘द केरळ स्टोरी-२’ हा चित्रपट महिला, तरुणी आणि मुलांनी आवर्जून पाहवा, असे आवाहन केले. “हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून हिंदू महिलांवरील अत्याचार आणि ‘लव्ह जिहाद’चे वास्तव मांडणारा आहे. लव्ह जिहाद रोखण्यासाठी श्रीराम सेनेने हेल्पलाइन सुरू केली असून दोन वर्षांत आलेल्या २ हजार कॉल्सपैकी ७५ टक्के समस्या आम्ही सोडवल्या आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
कुंभमेळ्यात रुद्राक्ष विकून ‘मोनालिसा’ नावाने प्रसिद्ध झालेल्या तरुणीने फरमान खान याच्याशी विवाह केल्याचा संदर्भ देत, केरळ हे धर्मांतराचे केंद्र बनले आहे आणि अशा प्रकरणांमध्ये भविष्यात अन्याय निश्चित असतो, अशी टीकाही त्यांनी केली.
कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या स्मारकाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद न केल्याबद्दल त्यांनी सरकारचा निषेध केला. देशासाठी लढणाऱ्या पहिल्या वीरांगनेच्या बाबतीत जातीचे राजकारण आणून अपमान केला जात आहे. राणी चन्नम्मा यांच्या स्मारकासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच श्रीराम नवमी आणि गुढीपाडव्यासारख्या सणांना हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments