Savadatti

सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या चरणी ३.०७ कोटींचे विक्रमी दान

Share

श्रीक्षेत्र सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर भाविकांच्या वाढत्या ओघामुळे देवीच्या चरणी अर्पण होणाऱ्या देणगीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली दानपेटी मोजणी पूर्ण झाली असून, यामध्ये ३ कोटींहून अधिक रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने जमा झाले आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील ऐतिहासिक श्री रेणुका यल्लम्मा मंदिरात यंदा विक्रमी दान जमा झाले आहे. ९ ते १२ मार्च दरम्यान पार पडलेल्या दानपेटी मोजणीत एकूण ३ कोटी ७ लाख रुपये मूल्याचे दान जमा झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली. गेल्या आठवड्यातच मोजणीची एक फेरी पार पडली असून या वेळी मोठ्याप्रमाणात दान जमा झाले आहे.

एकूण जमा झालेल्या दानाचा तपशील पाहता, भाविकांनी अर्पण केलेल्या रोख रकमेचा वाटा सर्वाधिक आहे. यामध्ये २ कोटी ७८ लाख रुपये रोख रकमेसह १६.१६ लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १२.३५ लाख रुपये किमतीचे सुमारे ४ किलो ५४७ ग्रॅम चांदीचे अलंकार जमा झाले आहेत. या मोजणी प्रक्रियेत मंदिर प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पारदर्शकपणे काम पूर्ण केले.

मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वर्षानुवर्षे वाढ होत असून, जमा झालेला हा निधी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मोजणी प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही जबाबदारी पार पाडल्याचे मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मुख्यतः भाविकांसाठी पिण्याचे पाणी, निवास व्यवस्था, स्वच्छतागृह आणि मंदिर परिसराचे सुशोभीकरण यांसारख्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी हा निधी खर्च केला जाईल, अशी माहिती मंदिर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Tags: