Belagavi

केपीसीसी अध्यक्षपदाबाबत जारकीहोळींचे सूचक विधान… म्हणाले…

Share

केपीसीसी अध्यक्षपदाच्या बदलावरून सध्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असून, बेळगाव किंवा गोकाकच्या नेत्याला हे पद मिळणार का, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी ‘वेळ आल्यावर बघू’ असे सूचक विधान केले आहे.

केपीसीसी अध्यक्षपद बेळगावला किंवा गोकाकच्या नेत्याला मिळणार असल्याच्या चर्चेवर बोलताना सतीश जारकीहोळी यांनी सावध पवित्रा घेतला. पद मिळाल्यावर त्याबद्दल सविस्तर चर्चा करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. डिनर पार्टीमध्ये अशा कोणत्याही विषयावर चर्चा झाली नसून हाय कमांडकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दिल्ली दौऱ्यात केवळ नेतृत्वातील गोंधळ मिटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

बेळगाव दक्षिण मतदारसंघातील सुमारे ६० हजार मतदार गायब असल्याच्या आरोपावर बोलताना जारकीहोळी यांनी हे आरोप फेटाळले. मतदार गायब झालेले नसून पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. अधिकारी घरोघरी जाऊन तीनदा तपासणी करत असून मतदारांचा शोध घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मॅपिंगची प्रक्रिया ९५ टक्के पूर्ण झाली असून येत्या रविवारी या संदर्भात पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे, असे सतीश जारकीहोळी यांनी नमूद केले.

एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने त्याचा वापर जपून करणे हाच सध्यातरी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ५०० कोटी रुपयांची थकबाकी सरकार नक्कीच देईल, असे आश्वासन त्यांनी दिले. आर्थिक उपलब्धतेनुसार हे पैसे दिले जाणार असून, अनेक सक्षम कारखान्यांनी आधीच पेमेंट केले आहे, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

शहरातील ‘सिटीज २’ योजनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. समाज कल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे २४ कोटी रुपये मिळण्यास विलंब झाला असून, याकडे तातडीने लक्ष देऊन निधी मिळवून दिला जाईल, असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

Tags: