Bagalkot

बागलकोटमध्ये शालेय स्नेहसंमेलनादरम्यान दलित तरुणाची निर्घृण हत्या

Share

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील सावळगी गावात एका शालेय वार्षिक स्नेहसंमेलनात शाळेच्या छतावर बसून कार्यक्रम पाहणाऱ्या सुधीर पांगे या १९ वर्षीय दलित तरुणाची अमानवीय मारहाण करून हत्या करण्यात आली असून संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

सावळगी येथील शासकीय केजीएस शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सुधीर पांगे हा तरुण शाळेच्या छतावर बसून कार्यक्रम पाहत होता. यावेळी त्याने अंगावर दगड भिरकावला, असा आरोप करत राजू, विजेंद्र आणि मल्लार्जुन या तिघांनी सुधीरला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुधीरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी सावळगी पोलीस ठाण्यात मृताच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली असून, आरोपींविरुद्ध खून आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तिन्ही आरोपींना तात्काळ अटक केली आहे.

एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. सध्या गावात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Tags: