मतदार याद्यांचे मॅपिंग करण्यासाठी पुढील रविवारी पुन्हा बैठक घेतली जाणार असून, तोपर्यंत प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते.


जिल्ह्यातील मतदार मॅपिंगचे काम एका आठवड्यात पूर्ण होऊ शकते. प्रशासनाने ७५ टक्के मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवावा, अशा सूचना सतीश जारकीहोळी यांनी दिल्या. कँटोन्मेंट बोर्ड, जेएनएमसी आणि वनविभागाच्या वसाहतींमधील मतदान केंद्रांच्या मॅपिंगसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बैठकीत सांगितले. मॅपिंग प्रक्रियेतून कोणीही सुटणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश मोहम्मद रोशन यांनी दिले.

जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. महाराष्ट्र सरकारकडून एक टीएमसी पाणी सोडल्यास पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे सतीश जारकीहोळी यांनी नमूद केले.
ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्यास ग्रामपंचायतींच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली. शहरात प्रमुख चौकांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरासे आणि जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन उपस्थित होते.


Recent Comments