Athani

अथणी : मालमत्तेच्या हव्यासापोटी महिलेची निर्घृण हत्या

Share

बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात एका महिलेची उसाच्या शेतात निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

सुजाता पवार (वय ३४) असे मृत महिलेचे नाव असून, मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अथणी येथील रहिवासी सुजाता पवार यांचा मृतदेह ५ मार्च रोजी प्रदीप गुंडा यांच्या उसाच्या शेतात आढळून आला होता. सुजाता या हारूगेरी येथील आपल्या पतीसोबतचे संबंध तोडून सध्या माहेरी अथणीमध्ये राहत होत्या. या काळात त्यांचे कुंभार हवालदार नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, सुजाता यांच्या नावावर असलेली मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी कुंभारने या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

आरोपी कुंभार याने ५ मार्च रोजी दुपारी सुजाता यांना आपल्या दुचाकीवरून नेले होते. त्यानंतर अथणीजवळील एका उसाच्या शेतात नेऊन त्याने कापडाच्या सहाय्याने सुजाता यांचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Tags: