चिकोडी येथील सीटीई संस्थेच्या अहिल्याबाई पाटील महाविद्यालयात महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून बेंगळुरू येथील प्रसिद्ध व्याख्यात्या आणि लेखिका हारिका मंजुनाथ या उपस्थित होत्या.


भारतावर परकीयांनी हजारो वर्षे सतत आक्रमणे केली, तरीही आज शंभर कोटींहून अधिक लोकांमध्ये आपली संस्कृती आणि परंपरा टिकून आहे, याचे सर्व श्रेय महिलांना जाते. महिलांनी परिधान केलेली टिकली आणि बांगड्यांमधूनही आपली संस्कृती दिसून येते. आपल्या किल्ल्यावर आणि स्वतःवर परकीयांचे आक्रमण होत असताना हातात तलवार घेऊन लढणाऱ्या कित्तूर राणी चन्नम्मा, ओणके ओबव्वा, ताराबाई, केळदी चन्नम्मा, बेलवडी मल्लम्मा यांसारख्या वीरांगना आपली खरी परंपरा आहेत, असे हारिका मंजुनाथ यांनी म्हटले.

भारतीय परंपरा ही जगातील इतर संस्कृतींच्या तुलनेत अत्यंत श्रेष्ठ आहे. आज भारतीय स्त्रिया केवळ लग्न, स्वयंपाकघर किंवा घराच्या उंबरठ्यापर्यंत मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रात हिरीरीने कार्य करत आहेत. समाजाला पुढे नेणारी गृहिणी आणि आर्थिक आधार देणारी स्त्री अशा विविध रूपांत वेदांमध्येही महिलांचे गुणगान गायले आहे. आपण महिलांकडे माता म्हणून पाहतो, ही आपली महान परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले.
बेळगाव जिल्ह्यामध्ये सीटीई संस्थेचे अहल्याबाई पाटील महाविद्यालय हे महिलांच्या शिक्षणासाठीचे अग्रगण्य महाविद्यालय असणे ही अभिमानास्पद बाब आहे. महिला दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींचे हळदी-कुंकू लावून केलेले स्वागत आणि विद्यार्थिनींनी परिधान केलेली साडी हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, अशा शब्दांत हारिका मंजुनाथ यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा तृप्ती कुलकर्णी, भाग्यश्री कुलकर्णी, शोभा मांजरेकर, नीलम अडके, कीर्ती कुलकर्णी, स्वाती देशपांडे, रेखा कुलकर्णी, गायत्री पडली, गौरी मांजरेकर, प्राचार्य डॉ. एस. सी. जकाते, श्रुती पाटील, पूजा बानकरे, उमा पत्तार, संयुक्त सचिव मिथुन देशपांडे, प्रियांका हिरेमठ, रोहिणी कुंभार, कस्तूरी निडोणी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments