Belagavi

स्वत:चा खरा गुरू आपण स्वतःच आहोत; मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे उद्गार

Share

प्रत्येकाने जीवन खिलाडूवृत्तीने जगले पाहिजे आणि आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या जीवनाचा खरा गुरू आपण स्वतःच आहोत, असे प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला आणि बालविकास विभाग तसेच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण विभागाच्या वतीने कंठीरवा स्टेडियमवर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बेंगळुरू शहर आणि ग्रामीण भागातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते झाले.

प्रत्येकाने शारीरिक तंदुरुस्ती जपली पाहिजे, असे सांगताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, मी गेल्या २५ वर्षांपासून नियमितपणे योगासने आणि एरोबिक्स करत आहे. आतापर्यंत मी १९ योग शिबिरांमध्ये सहभागी झाले असून त्यापैकी ११ शिबिरे रामदेव बाबा यांची होती. वयापेक्षा आरोग्य महत्त्वाचे आहे. आजच्या काळात आपण इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःला सक्षम ठेवणे गरजेचे आहे. आपण कोणावरही ओझे होऊ नये यासाठी सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

सतत कामाच्या दबावाखाली असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अशा क्रीडा स्पर्धा अत्यंत आवश्यक आहेत. खेळामुळे केवळ शारीरिक क्षमताच नाही तर बौद्धिक स्तरही उंचावतो, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक सूर्यनमस्कार घालणाऱ्या कर्मचाऱ्याला २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा केली.

क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वतः मैदानात उतरून क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी एका कर्मचाऱ्याला चक्क ‘बोल्ड’ करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला विभागाच्या सचिव डॉ. शामला इक्बाल, संचालक महेश बाबू, विशेष कर्तव्य अधिकारी बी. एच. निश्चल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: