NANDAGAD

नंदगड-रायपूर रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

Share

खानापूर तालुक्यातील नंदगडमध्ये रात्रीच्या सुमारास एक महाकाय वडाचे झाड मुख्य रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तत्परता दाखवल्याने नागरिकांमधून प्रशंसा होत आहे.

खानापूर तालुक्यातील नंदगडमधील रायपूर रस्त्यावर काल रात्री एक महाकाय वडाचे झाड अचानक रस्त्याच्या मधोमध उन्मळून पडले. हा रस्ता नेहमीच वाहनांच्या वर्दळीने गजबजलेला असतो, मात्र सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुधवारी नंदगडचा आठवडी बाजार असल्याने या रस्त्यावर हजारो लोकांची ये-जा असते, परंतु झाड पडले त्या वेळी तिथे कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच नंदगडमधील उपवनपरिक्षेत्र अधिकारी माधुरी दळवाई यांनी विलंब न लावता आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रात्रीची वेळ असूनही वनविभागाच्या पथकाने तातडीने मोहीम राबवून झाड कापून रस्त्यावरून बाजूला केले आणि विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. वनविभागाच्या या तत्पर प्रतिसादामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tags: