धारवाडमधील जन्नत नगर भागातील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे परिसरात विषारी धूर पसरला असून, या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेने रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हुबळी-धारवाड महानगरपालिका कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत पालिकेसह जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. धारवाडमधील होस यल्लापूर स्मशानभूमीला लागून असलेल्या या कचरा डेपोला समाजकंटकांकडून वारंवार आग लावली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या कचरा डेपोतून निघणाऱ्या विषारी धुरामुळे टोल नाका, विद्यागिरी, लक्ष्मी नगर, जन्नत नगर, होस यल्लापूर, नवलूर आगसी, यालक्की शेट्टर कॉलनी, शिवानंद नगर, चप्पर बंद कॉलनी आणि रामनगर परिसरातील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या धुरामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एवढी गंभीर परिस्थिती असूनही पालिका आणि जिल्हा प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश निंबाळकर यांनी म्हटले.
प्रशासनाने या समस्येवर त्वरित ठोस तोडगा न काढल्यास शिवसेनेच्या वतीने आगामी काळात उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.


Recent Comments