Belagavi

बेळगावमध्ये शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पाच वर्षांची कोठडी

Share

बेळगावमधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्हा न्यायालयाने पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

शाळेतून घरी परतणाऱ्या मुलीला कारमध्ये बसवून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. बेळगावमधील मण्णूर येथील रहिवासी रामा मुकुंद तरळे याने मार्च २०२३ मध्ये एका शाळकरी मुलीला कार शिकविण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी किरणकुमार तावरगी यांनी तातडीने दोषारोपपत्र सादर केले होते.

जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी या प्रकरणाची सुनावणी करून आरोपीला पाच वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी या प्रकरणात प्रभावी युक्तिवाद केला. या प्रकरणाचा सखोल तपास करणारे एसीपी गंगाधर टी. एम., पीआय किरणकुमार तावरगी आणि त्यांच्या पथकाचे बेळगाव पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.

Tags: