राज्यात बेकायदेशीर दारूचा व्यवसाय फोफावत असून गोवा आणि शेजारील राज्यांमधून येणाऱ्या बनावट दारूमुळे सीमाभागातील तरुण व्यसनाधीन होत असल्याचा मुद्दा विधान परिषदेत गाजला.

सदस्य नागराज यादव यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेत अबकारी विभाग बनावट दारू रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. विधान परिषदेत बोलताना नागराज यादव यांनी नमूद केले की, अबकारी विभागाने मागील आर्थिक वर्षात दिलेले लक्ष्य गाठलेले नाही. दारू पिणाऱ्यांची संख्या कमी झाली म्हणून समाधान वाटले असले तरी, प्रत्यक्षात गोव्यातील सी.एच. पावडर वापरून तयार केलेली बनावट दारू आणि रायचूर व बेळगावमार्गे येणारा अवैध साठा चिंतेची बाब आहे. अबकारी विभाग यावर कोणतीही कारवाई करत नाही. सीमाभागातील तरुण रोजगारासाठी इतर राज्यात जाऊन दारूच्या आहारी जात असून यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
यावर अबकारी मंत्री थिम्मापूर यांच्या वतीने सभागृह नेते आणि लघुसिंचन मंत्री एन. एस. भोसराजू यांनी उत्तर दिले. अबकारी विभागाने गेल्या वेळेपेक्षा ४ हजार कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंध्र प्रदेशात दारूचे दर कमी झाल्यामुळे तिथून होणारी खरेदी घटली आहे, तसेच अतिवृष्टी आणि थंडीमुळे बिअरची मागणी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव आणि रायचूर सीमाभागातील अवैध दारू विक्रीप्रकरणी रायचूरमध्ये पाच जणांवर कारवाई करण्यात आली असून एकाला तडीपार करण्यात आले असल्याची माहिती एन. एस. भोसराजू यांनी दिली.


Recent Comments