बेळगावमध्ये पेट्रोल चोरांच्या एका टोळीने हैदोस घातला असून भररस्त्यात घातक शस्त्रांसह वाहनांमधील पेट्रोल चोरी करण्याचे प्रकार समोर आले आहेत. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानाजवळच हा प्रकार घडला असून चोरीचा हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

बेळगावमधील हनुमान नगर येथील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत पेट्रोल चोरांच्या टोळीने सलग चोऱ्यांचा प्रयत्न केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पेट्रोलचे दर वाढण्याच्या शक्यतेने सक्रिय झालेल्या या टोळीतील चोरट्यांनी तोंडाला मास्क लावले होते. त्यांच्या हातात लाँग, कोयते आणि पेट्रोल भरण्यासाठी रिकाम्या बाटल्या असल्याचे दिसून आले आहे. घरासमोर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकींना लक्ष्य करून त्यातील इंधन चोरण्याचा प्रयत्न या टोळीने केला आहे.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानाजवळच ही घटना घडल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या चोरांच्या टोळीने धुमाकूळ घातल्याची दृश्ये परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहेत. केवळ दुचाकीच नव्हे, तर कारच्या टँकवरही डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या या टोळीवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी बेळगावमधील नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.


Recent Comments